Monday 3 November 2014

-:( कोण गेले ):-



गजल 

हा डाव मांडलेला उधळून कोण गेले ? 
दारावरी सुखाला अडवून कोण गेले ?? 

मी पाहिली उद्याची स्वप्ने किती गुलाबी ? 
डोळ्यात आसवांना सजवून कोण गेले ?? 

माझ्याच जीवनाला श्वासात कैद केले ;
आयुष्य हाय माझे विझवून कोण गेले ??

आला वसंत होता घेवून पाखरांना ;
वाटेत या फुलांना तुडवून कोण गेले ??

रातीस कोण देतो अंधार पांघराया ?
आभाळचांदण्यांना पसरून कोण गेले ??

कविकुमार -
(२।१०।१४)


-:( देवा ):-


-:( प्रश्न ):-


गजल

अंत नाही भेटला मजला नभाचा !
वेध तेव्हा घेतला मी या जगाचा !

जिंकले आम्ही जरी आकाश सारे ;
शोध नाही लागला पण माणसाचा !!

जन्म माझा का तुला झाला नकोसा ? 
एक साधा प्रश्न होता अर्भकाचा !!

मागणे इतकेच आता मागते मी ;
पाज मजला थेँब तू आई दुधाचा !!

वार तू केलेस जेव्हा काळजावर ;
वेदनांना गंध आला चंदनाचा !!

कविकुमार -
(३०।९।१४)



Sunday 14 September 2014

-:( आता ):-

गजल 

जीवनाची शोधली मी रीत आता ! 
पेरतो शब्दात माझ्या गीत आता !! 

दान मागायास आलो यातनांचे ; 
वेदना दे फक्त या झोळीत आता !! 

तेल नाही , तूप नाही , वात नाही ; 
आसवांना जाळतो पणतीत आता !! 

चाललो ठेवून मागे दुःख माझे ; 
दाटते डोळ्यांत वेडी प्रीत आता !! 

ईश्वरा , मी ज्या ठिकाणी जन्मलेलो ; 
जाळ मजला त्याच तू मातीत आता !! 

कविकुमार - 
(१४।९।१४)


Saturday 6 September 2014

-:( भास होता ):-



-:( माणसे ):-

भासली साधीच तेव्हा बोलणारी माणसे !
भेटली नाही मनाला भावणारी माणसे !!

वाटली होती अशी लाचार झाली श्वापदे ;
स्वार्थतेपोटी जगाला चावणारी माणसे !!

जन्मभर ज्याने सुखाचे ते निखारे सोसले ;
पहिली त्या माणसांना जाळणारी माणसे !!

गायले त्यांनीच होते जीवनाचे गोडवे ;
एक प्याला जिंदगीचा प्राषणारी माणसे !!

भेद एसा कोणता केला विधात्याने कधी ?
धर्म , जाती वेगळ्या ही थाटणारी माणसे !!

एक आहे तो जिवात्मा अंतरी जो नांदतो ;
पत्थरांना दैव सारी मानणारी माणसे !!

कविकुमार -
(६/८/१४)

Friday 5 September 2014

-:(फार झाले):-

गजल 

हे कोणते गुलाबी हलकेच वार झाले ? 
नजरेतल्या अदेने घायाळ फार झाले !! 

तू पाहिलेस जेव्हा लाजून या दिशेला ; 
माझ्याच काळजाचे तुकडे हजार झाले !! 

मी शोध घेत आहे माझ्याच त्या मनाचा ; 
समजेच ना मला ते कोठे पसार झाले ? 

तू भेटलीस आता जगण्यात सोबतीला ; 
माझेच जीवनाशी काही करार झाले !! 

सांगू कुणास आता हे हाल काळजाचे ? 
संचीत भावनांचे हृदयास भार झाले !! 

कविकुमार - 
(१५।७।१४)


-:( आस वेडी ):-

सारं काही तेव्हारख 
आपोआपच घडत होत ! 
आज तिच्या आठवणीँत 
चक्क आभाळ रडत होत !! 

भेगाळलेली जमिन 
अण् दाटले होते ढग ! 
मेघ म्हणाले धरतीला 
मला एकदा तरी बघ !! 

करपलेली माती आता 
त्याचीच वाट पहात होती ! 
तू बरस आता माझ्यावर 
तिची नजर सांगत होती !! 

वारा उनाड झाल्यासारखा 
सैरा-वैरा पळत होता ! 
या दोघांची आस वेडी 
तो गमतीने बघत होता !! 

ढगं अलगद वार्यासोबत 
दूर-दूर निघून गेले ! 
धरतीचेही चित्त तेव्हा 
आपल्यासोबत घेवून गेले !! 

तेव्हाच मला वाटत "प्रेम" 
पावसाच्या थेँबांसारख असत ! 
गोळा करण्याच्या प्रयत्नातच 
ते हरवून जात असत !! 

कविकुमार - 
(२२।७।१४)


Wednesday 4 June 2014

-:[ ती खरी कविता होती ]:-



जी ओठावरती स्पुरली 
ती खरी कविता होती ! 
जी शब्दांतून निखळली 
ती खरी कविता होती !! 

यादेत एकदा राणी मी 
स्मरले जेव्हा तुजला ; 
जी गालावर ओघळली 
ती खरी कविता होती !! 

वाटेत भासली मजला 
ती साथ कुणाची तेव्हा ? 
जी छाया दूर पसरली 
ती खरी कविता होती !! 

गेलीस दूर तू इतकी 
आयुष्य अपुरे झाले 
जी डोळ्यातुन बरसली 
ती खरी कविता होती !! 

एकाच तुझ्या स्पर्षाने 
रोमांच दाटले आता ; 
जी अंगावर मोहरली 
ती खरी कविता होती !! 

तू तोडलास जो माझा 
लचका या प्रारब्धाचा ; 
जी जखमेतुन भळभळली 
ती खरी कविता होती !! 

ती लाट हवेची जेव्हा 
सांगावा घेवून आली ; 
जी हृदयातुन निघाली 
ती खरी कविता होती !! 

कविकुमार - 
(२५।५।१४) 

-:[ चार ओळी ]:-

गजल 

मांडलेल्या चार ओळी !
भावलेल्या चार ओळी !!

गोठलेले शब्द तेव्हा ;
सांडलेल्या चार ओळी !!

जीवनाचे सार माझ्या ;
वेचलेल्या चार ओळी !!

मी जरासा गंध वेडा ;
बहरलेल्या चार ओळी !!

व्यक्त मी झालोच नाही ;
ओतलेल्या चार ओळी !!

मी नशेच्या वेदनेला ;
पाजलेल्या चार ओळी !!

जा 'कुमारा' बोल आता ;
साठलेल्या चार ओळी !! 

कविकुमार -
(४।६।१४)

-:( माय माझी ):-

गजल 

भावनांनी आज खचली माय माझी 
भाकरीसाठीच झिजली माय माझी 

घास प्रेमाचा मुखी भरवून माझ्या 
आसवे प्राशून निजली माय माझी 

ना तिने केला कधी शृंगार तेव्हा 
वेदनांनी रोज सजली माय माझी 

ना तिच्या कष्ठात तो दुष्काळ आला 
पावसाने त्याच भिजली माय माझी 

मी तिच्या हृदयातला अंकुर होतो 
का मलाही ना उमगली माय माझी 

कविकुमार - 
(२।६।१४)


Wednesday 7 May 2014

-:( पाहिजे ):-


गजल 

जीवनाची अशी योजना पाहिजे ! 
दे जराशी मला वेदना पाहिजे !! 

गोठलेले असे भाव हृदयातले ; 
काळजाला नवी भावना पाहिजे !! 

रोज छळतात ते भास मजला तुझे ; 
सावलीने दिली चेतना पाहिजे !! 

मीच भजतो जरी पत्थराला असा ; 
देव नसला तरी साधना पाहिजे !! 

तूच होता 'कुमारा' नवी प्रेरणा ; 
श्वास कोठे मला जीवना पाहिजे ?? 

कविकुमार - 
(२१।४।१४)


-:( प्रमाणे ):-




नुसताच वेध घोतो मी पावलाप्रमाणे ! 
फिरतो उगाच आहे मी पाखराप्रमाणे !! 

दिदले तुलाच होते आयुष्य दान माझे ; 
जळतो असाच आहे मी कापराप्रमाणे !! 

माझ्याच चेहऱ्‍याला मी जानलेच नाही ; 
लपवीत दुःख होता तो आरशाप्रमाणे !! 

तू तर नदीच होती संचित वाहणारी ; 
पण मी अथांग होतो त्या सागराप्रमाणे !! 

कसला 'कुमार' तेव्हा साक्षात रौद्र होता ; 
जगतो कसा असा रे तो काफराप्रमाणे ? 

कविकुमार - 
(२६।४।१४)

Sunday 9 March 2014

-:( येवून जा ):-

गजल 

रात्र आहे जीवघेणी तू जरा येऊन जा !
चंद्र आहे एकटासा चांदण्या ठेवून जा !!

मी उशाला घेतल्या संवेदना प्रीतीतल्या
लोचनाना आज माझ्या स्वप्न तू देऊन जा !!

घेतले ताब्यात माझ्या काळजाला तू जसे ;
एकदा येऊन माझे श्वासही घेऊन जा !!

मोल माझ्या वेदनेचे ना कधी कळले तुला ;
ये जराशी ढाळलेली आसवे वेचून जा !!

जे तिला ना भेटले ते दे 'कुमारा' दे तिला ;
जा तिच्या हृदयात थोडे प्रेम तू पेरुन जा !!

कविकुमार -
(१०।३।१४)



-:( किणारा ):-



रात्रीत चांदण्या निजता 
अंधार पाहुना येतो ! 
डोळ्यातून गळती धारा 
श्वासातून वारा गातो !! 

दाटते गुलाबी थंडी 
उठतात मनाच्या लाटा ! 
क्षितीजास भेदुनी जाती 
नजरेच्या पाऊलवाटा !! 

गेलेल्या आयुष्याचा 
आवरतो आज पसारा ! 
मी विझून जातो तेव्हा 
मोहरतो हाच किणारा !! 

तो वसंत येता दारी 
पाखरास चाहुल होते ! 
प्रितीच्या मंद सुरांनी 
हलकीच जाग मज येते !! 

कविकुमार - 
(६।३।१४)

-:( प्रेम ):-

डोळ्यात तेव्हा खरे प्रेम होते नजरेतुनी प्रेम उमलायचे ! 
जरी बोल माझे मुके जाहलेले अबोल्यातही शब्द भेटायचे !! 

तुझी ओढ आता मला लागलेली किती मी दुरावेच सोसायचे ? 
तुझ्या आठवाचे किती पावसाळे मनाला उगा चिँब भिजवायचे ! 

फुलांनी फुलांना कधी माळले की गुलाबातही गंध दाटायचे ! 
ऋतुंनी ढगांना जरा गाठले की नव्याने जुने कोँब उगवायचे !! 

नभाचा किती खोल काळोख होता किती चांदणे त्यात चमकायचे ! 
जरा एक तारा कधीही निखळता चंद्रासही दु:ख  वाटायचे !! 

असेही किणारे प्रतिक्षेत होते लाटेस तेव्हा उरी घ्यायचे ! 
मनाने मनाला दिलेले वचनही नवा जन्म घेवून पाळायचे !! 

कविकुमार - 
(५।३।१४)


Thursday 27 February 2014

-:( मराठी ):-



आस मराठी 
ध्यास मराठी ! 
या हृदयाचा ; 
श्वास मराठी !! 

मान मराठी 
जान मराठी ! 
या जगण्याची 
शान मराठी !! 

बात मराठी 
मात मराठी ! 
दिव्यात लावू 
वात मराठी !! 

ठाव मराठी 
भाव मराठी ! 
समृद्धिचे 
नाव मराठी !! 

कविकुमार - 
(२६।२।१४)

Friday 21 February 2014

-:( मंजूर नाही ):-


गझल 


बोल माझ्या पापण्यांचे का तुला मंजूर नाही ? 
वाहणे या आसवांचे का तुला मंजूर नाही ?? 

सोबतीला चंद्र नाही , रात्र आहे जीवघेणी ; 
जागणे हे चांदण्यांचे का तुला मंजूर नाही ? 

चांगली गंधाळलेली बाग आहे त्या फुलांची ; 
लाजणे छोट्या कळ्यांचे का तुला मंजूर नाही ? 

सोड आता , फार झाले ना बहाने टाळण्याचे ; 
भाळणे या आठवांचे का तुला मंजूर नाही ?? 

अंत झाला जीवनाचा मी जरी नाही जगी त्या ; 
भास माझे भासण्याचे का तुला मंजूर नाही ?? 

कविकुमार - 
(१८।२।१४)


-:( सार ):-




गजल 

तू काळजावर वार केले ! 
मी वेदनेचे हार केले !! 

तू कोँडलेले श्वास माझे ; 
मी भावनेला दार केले !! 

तू आखलेली बंधने पण ; 
मी अंतरांना पार केले !! 

तू तोडले माझ्यामनाला ; 
मी टाचले , तैयार केले !! 

मी वाचले कित्येक दोहे ; 
ह्या जीवनाचे सार केले !! 

कविकुमार - 
(१७।२।१४)

-:( हिशोब दे ):-


जाते आहेस सोडून मजला 
खुशाल जा , पण हिशोब दे ! 
नात्यासाठी साठवलेल्या 
स्वप्नांचा तू हिशोब दे ! 

चंद्रालाही सांगत होतो 
तुझी नी प्रित अशी 
तुझ्याचसाठी जागवलेल्या 
राञींचा तू हिशोब दे ! 

वेचत होतो फुले मी जेव्हा 
बाग सकाळी जागत होती 
हृदयाभोवती मोहरलेल्या 
गंधाचा तू हिशोब दे ! 

कशी अवेळी भेटत होती 
तुझी आठवण मजला 
तुझ्याचसाठी घालवलेल्या 
वेळेचा तू हिशोब दे !! 

डोळ्यांच्याही पापण्यांतली 
ओल कडेची दडवत होतो 
तुझ्याचसाठी ओघळलेल्या 
अश्रुंचा तू हिशोब दे !! 

कविकुमार - 
(१२।२।१४)


Monday 27 January 2014

-:( मन खुप दुखत आहे ):-

डोळ्यात माझ्या आजही 
तुझी स्वप्न खुपत आहे 
कस सांगु कुणाला आज 
मन खुप दुखत आहे 

कस माफ करू तुला 
हे घाव तू मला दिले 
घेऊन माझे गुलाब 
तू काटेच मला दिले 

वाटलेलं कधीतरी
तू परत नक्की येशील 
जवळ माज्या येउन
मला पुन्हा कवेत घेशील 

विश्वासाने एक नात 
मी तुज्याशी जपलेल 
तू मात्र माझ हृदय 
पुन्हा पुन्हा तोडलेल 


कविकुमार -
(24-1-14)