Thursday 27 February 2014

-:( मराठी ):-



आस मराठी 
ध्यास मराठी ! 
या हृदयाचा ; 
श्वास मराठी !! 

मान मराठी 
जान मराठी ! 
या जगण्याची 
शान मराठी !! 

बात मराठी 
मात मराठी ! 
दिव्यात लावू 
वात मराठी !! 

ठाव मराठी 
भाव मराठी ! 
समृद्धिचे 
नाव मराठी !! 

कविकुमार - 
(२६।२।१४)

Friday 21 February 2014

-:( मंजूर नाही ):-


गझल 


बोल माझ्या पापण्यांचे का तुला मंजूर नाही ? 
वाहणे या आसवांचे का तुला मंजूर नाही ?? 

सोबतीला चंद्र नाही , रात्र आहे जीवघेणी ; 
जागणे हे चांदण्यांचे का तुला मंजूर नाही ? 

चांगली गंधाळलेली बाग आहे त्या फुलांची ; 
लाजणे छोट्या कळ्यांचे का तुला मंजूर नाही ? 

सोड आता , फार झाले ना बहाने टाळण्याचे ; 
भाळणे या आठवांचे का तुला मंजूर नाही ?? 

अंत झाला जीवनाचा मी जरी नाही जगी त्या ; 
भास माझे भासण्याचे का तुला मंजूर नाही ?? 

कविकुमार - 
(१८।२।१४)


-:( सार ):-




गजल 

तू काळजावर वार केले ! 
मी वेदनेचे हार केले !! 

तू कोँडलेले श्वास माझे ; 
मी भावनेला दार केले !! 

तू आखलेली बंधने पण ; 
मी अंतरांना पार केले !! 

तू तोडले माझ्यामनाला ; 
मी टाचले , तैयार केले !! 

मी वाचले कित्येक दोहे ; 
ह्या जीवनाचे सार केले !! 

कविकुमार - 
(१७।२।१४)

-:( हिशोब दे ):-


जाते आहेस सोडून मजला 
खुशाल जा , पण हिशोब दे ! 
नात्यासाठी साठवलेल्या 
स्वप्नांचा तू हिशोब दे ! 

चंद्रालाही सांगत होतो 
तुझी नी प्रित अशी 
तुझ्याचसाठी जागवलेल्या 
राञींचा तू हिशोब दे ! 

वेचत होतो फुले मी जेव्हा 
बाग सकाळी जागत होती 
हृदयाभोवती मोहरलेल्या 
गंधाचा तू हिशोब दे ! 

कशी अवेळी भेटत होती 
तुझी आठवण मजला 
तुझ्याचसाठी घालवलेल्या 
वेळेचा तू हिशोब दे !! 

डोळ्यांच्याही पापण्यांतली 
ओल कडेची दडवत होतो 
तुझ्याचसाठी ओघळलेल्या 
अश्रुंचा तू हिशोब दे !! 

कविकुमार - 
(१२।२।१४)