Monday 27 January 2014

-:( मन खुप दुखत आहे ):-

डोळ्यात माझ्या आजही 
तुझी स्वप्न खुपत आहे 
कस सांगु कुणाला आज 
मन खुप दुखत आहे 

कस माफ करू तुला 
हे घाव तू मला दिले 
घेऊन माझे गुलाब 
तू काटेच मला दिले 

वाटलेलं कधीतरी
तू परत नक्की येशील 
जवळ माज्या येउन
मला पुन्हा कवेत घेशील 

विश्वासाने एक नात 
मी तुज्याशी जपलेल 
तू मात्र माझ हृदय 
पुन्हा पुन्हा तोडलेल 


कविकुमार -
(24-1-14)


-:( भेदभाव ):-



काय तुम्हा सांगु 
समाजाची रीतं ! 
यांनी उभारीली 
भेदभावाची ही भीतं !! 

रंग वेगळे वेगळे 
झेँडे यांनी उभारीले ! 
रक्त लालच रंगाचे 
त्याने का रे भीनवीले !! 

राजमुद्रेतला सिँह 
शब्द माझा तलवार ! 
नाही जातीपाई केला 
आम्ही कधी एल्गार !! 

कधी दगडांची झुंज 
कधी रक्ताचे ते पाट ! 
आता विसरलो आम्ही 
सुखी समतेची वाट !! 

कविकुमार - 
(३।१२।१३)

-:[ कवित्व ]:-


मला ना कळाले 
आम्ही काय केले 
मला हे कवित्व 
तुम्ही दाण केले 

जरी मांडले मी 
जे शब्दात आले 
तया लोचनांनी 
आम्हा तृप्त केले 

मनी भावनांना 
नवे स्थान झाले 
नवे नाव आणि 
हे अस्तित्व व्याले 

जगी चांगले तेच 
ओठात आले 
जवा जाग आली 
तवा भान आले 

मला ना कळाले 
आम्ही काय केले 
मला हे कवित्व 
तुम्ही दाण केले 

कविकुमार - 
[१७।१२।१३]



गजल 

आयुष्य छान आहे ! 
पण ते लहान आहे !! 

सर्वञ वेदनांचे ; 
मोकाट रान आहे !! 

मुर्ती लहान दिसते ; 
किर्ती महान आहे !! 

माझ्यात मृगजळाची ; 
मोठी तहान आहे !! 

ओठावरीच गीता ; 
हृदयी कुरान आहे !! 

आता पराभवाने ; 
भयभीत जान आहे !! 

अंती तरी 'कुमारा' ; 
अंगात ञान आहे !! 

कविकुमार - 
(२४।११।१३)

-:( प्रारब्धा थीगळ ):-

सावरले पापनीला 
आला पोटाशी ओघळ 
भावनांशी झुंजताना 
लागे प्रारब्धा थीगळ 

ढग दाटले मनात 
शब्द आडले ओठात 
गोठलेल्या लेखनीला 
माझ्या आसवांची भ्रांत 

पाणी आटताना आला 
पहा श्रावनाचा मास 
तृष्णेपाई ओढावला 
मृगजळाचा तो भास 

गंध मातीचा दरवळे 
ऋतु भावनांचे ओले 
लागे मनात हालाया 
जुन्या आठवांचे झुले 

वळताना आज वाती 
गुज मनाचे कथीले 
लावताना शब्दज्योत 
प्रेम दिव्यात ओतीले 

कविकुमार - 
(२०।३।१३)

-:( करार जीवनाचा ):-


गजल 


माझाच 
जीवनाशी ऐसा करार होता ! 
डोळ्यात आसवांना माझा नकार होता !! 

आदर्श जीवनाच्या साऱ्‍याच आठवांचा ; 
माझ्या तनामनाशी खोटाच भार होता !! 

सोडून चाललो मी काही सुधारकांना ; 
आयुष्य जाणण्याचा तो एक सार होता !! 

एकेक श्वास माझा होता गुलाम त्यांचा ; 
भयभीत काळजावर अज्ञात वार होता !! 

पोटात
 भूक मोठी ही खंत भाकरीला ; 
ऐकाच ढेकराचा त्यांचा पगार होता !! 

विश्वासघातक्यांचे मार्गावरी निखारे ; 
सांगु कुणाकुणाला पण तो , "कुमार" होता !! 

कविकुमार - 
(१८।११।१३)

-:[ मोती तुझ्या स्मितांचे ]:-


भरगच्च आठवांनी 
काळीज उसवले होते 
मोती तुझ्या स्मितांचे 
हृदयात दडवले होते 

बघ काळ्या राञीलाही 
एकांत रोजचा छळतो 
नक्षञ तुझ्या स्मरनाचे 
चंद्रास बिलगले होते 

गेलेल्या आयुष्याचे 
घोट कडू मी प्यालो 
क्षण तुझ्याच सोबतीचे 
जगण्यात मिसळले होते 

झेलाया रीमझीम थोडी 
मी ओँझळ अलगद केली 
नभ माझ्या प्रारब्धाचे 
आधीच बरसले होते 

माझ्या खुळ्या मनाचा 
केला न खयाल कोणी ? 
नुसतेच तुझ्या स्वप्नांचे 
मी गावं सजवले होते 

मागाया सौख्य जरासे 
मी मीटले डोळे जेव्हा 
पण आकाशीचे सारे 
तारेच निखळले होते 

कविकुमार - 
(२६।१०।१३)

-:( व्यर्थता ):-


तू होतीस तोवरी या 
भावनांना अर्थ होता 
आज माझ्या लेखनीचा 
शब्द-शब्द व्यर्थ होता 

तू होतीस तोवरी या 
स्वप्नांना अर्थ होता 
आज माझ्या पापणीचा 
थेँब-थेँब व्यर्थ होता 

तू होतीस तोवरी या 
आठवांना अर्थ होता 
आज माझ्या मोगऱ्‍याचा 
गंध-गंध व्यर्थ होता 

तू होतीस तोवरी या 
जगण्याला अर्थ होता 
आज माझ्या स्पंदनांचा 
श्वास-श्वास व्यर्थ होता 

कविकुमार - 
(२।१०।१३)

Sunday 26 January 2014

-:( व्यथा ):-



गजल 

हे बघा प्रारब्ध माझे टांगलेली लक्तरे ! 
फाटले अस्तीत्व तेव्हा लावलेली अस्तरे !! 

बाग होती त्या कळ्यांची श्वास माझे कोँडले ; 
पण फुले गंधाळताना गोठलेली अत्तरे ! 

वेचण्या दाणे सुखाचे मी जरी झेपावलो ; 
झोँबलि घसास माझ्या ती भुकेली पाखरे ! 

भासला एकांत जेव्हा हाक मी त्याला दीली ; 
जवळ त्याला ओढताना वाढलेली अंतरे ! 

तारले कोणीच नाही हे 'कुमारा' आजही ; 
दैव नाही पण तरीही पुजलेली पत्थरे ! 

कविकुमार - 
(१३।९।१३)