Sunday 9 March 2014

-:( येवून जा ):-

गजल 

रात्र आहे जीवघेणी तू जरा येऊन जा !
चंद्र आहे एकटासा चांदण्या ठेवून जा !!

मी उशाला घेतल्या संवेदना प्रीतीतल्या
लोचनाना आज माझ्या स्वप्न तू देऊन जा !!

घेतले ताब्यात माझ्या काळजाला तू जसे ;
एकदा येऊन माझे श्वासही घेऊन जा !!

मोल माझ्या वेदनेचे ना कधी कळले तुला ;
ये जराशी ढाळलेली आसवे वेचून जा !!

जे तिला ना भेटले ते दे 'कुमारा' दे तिला ;
जा तिच्या हृदयात थोडे प्रेम तू पेरुन जा !!

कविकुमार -
(१०।३।१४)



-:( किणारा ):-



रात्रीत चांदण्या निजता 
अंधार पाहुना येतो ! 
डोळ्यातून गळती धारा 
श्वासातून वारा गातो !! 

दाटते गुलाबी थंडी 
उठतात मनाच्या लाटा ! 
क्षितीजास भेदुनी जाती 
नजरेच्या पाऊलवाटा !! 

गेलेल्या आयुष्याचा 
आवरतो आज पसारा ! 
मी विझून जातो तेव्हा 
मोहरतो हाच किणारा !! 

तो वसंत येता दारी 
पाखरास चाहुल होते ! 
प्रितीच्या मंद सुरांनी 
हलकीच जाग मज येते !! 

कविकुमार - 
(६।३।१४)

-:( प्रेम ):-

डोळ्यात तेव्हा खरे प्रेम होते नजरेतुनी प्रेम उमलायचे ! 
जरी बोल माझे मुके जाहलेले अबोल्यातही शब्द भेटायचे !! 

तुझी ओढ आता मला लागलेली किती मी दुरावेच सोसायचे ? 
तुझ्या आठवाचे किती पावसाळे मनाला उगा चिँब भिजवायचे ! 

फुलांनी फुलांना कधी माळले की गुलाबातही गंध दाटायचे ! 
ऋतुंनी ढगांना जरा गाठले की नव्याने जुने कोँब उगवायचे !! 

नभाचा किती खोल काळोख होता किती चांदणे त्यात चमकायचे ! 
जरा एक तारा कधीही निखळता चंद्रासही दु:ख  वाटायचे !! 

असेही किणारे प्रतिक्षेत होते लाटेस तेव्हा उरी घ्यायचे ! 
मनाने मनाला दिलेले वचनही नवा जन्म घेवून पाळायचे !! 

कविकुमार - 
(५।३।१४)