Wednesday 4 June 2014

-:[ ती खरी कविता होती ]:-



जी ओठावरती स्पुरली 
ती खरी कविता होती ! 
जी शब्दांतून निखळली 
ती खरी कविता होती !! 

यादेत एकदा राणी मी 
स्मरले जेव्हा तुजला ; 
जी गालावर ओघळली 
ती खरी कविता होती !! 

वाटेत भासली मजला 
ती साथ कुणाची तेव्हा ? 
जी छाया दूर पसरली 
ती खरी कविता होती !! 

गेलीस दूर तू इतकी 
आयुष्य अपुरे झाले 
जी डोळ्यातुन बरसली 
ती खरी कविता होती !! 

एकाच तुझ्या स्पर्षाने 
रोमांच दाटले आता ; 
जी अंगावर मोहरली 
ती खरी कविता होती !! 

तू तोडलास जो माझा 
लचका या प्रारब्धाचा ; 
जी जखमेतुन भळभळली 
ती खरी कविता होती !! 

ती लाट हवेची जेव्हा 
सांगावा घेवून आली ; 
जी हृदयातुन निघाली 
ती खरी कविता होती !! 

कविकुमार - 
(२५।५।१४) 

No comments:

Post a Comment