Sunday, 10 November 2013

-:( भोग ):-




आले देवपण ज्याला 
घाव टाकिचे सोसले 
जगताना जीवनाचे 
भोग कोणाला चुकले 

आलो गरीबाच्या पोटी 
जन्म मातीमोल झाला 
ज्याला पुजले मनाशी 
तोच डावलुन गेला 

भुक लागते पोटाला 
घास नशिबात नाही 
शोध घेता देवळात 
देव दगडात नाही 

अरे मानसा मानसा 
जाण मानसाची खंत 
जात-पातीपाई केला 
भाऊ मानसाचा अंत 

कविकुमार - 
(८।७।१३)

-:[ मनाचे भाव माझ्या ]:-


विसरता येत नाही 
असे उरलेच काही 
मनाचे भाव माझ्या 
तिला कळलेच नाही 

तिला सजनी म्हणालो 
कधी हरनी म्हणालो 
तिच्या डोळ्यांत तेव्हा 
जरी पुरता बुडालो 
उरीचे स्वप्न माझे 
कधी सजलेच नाही 
मनाचे भाव माझ्या 
तिला कळलेच नाही 

तिने वचने दिलेली 
कधी ना सोडण्याची 
तरी अधुरीच माझी 
कहानी जीवनाची 
मला स्विकारनेही 
तिला जमलेच नाही 
मनाचे भाव माझ्या 
तिला कळलेच नाही 

कविकुमार - 
(१९।६।१३)


Thursday, 29 August 2013

-:( नर्तकी ):-



गजल 

नाचणाऱ्‍या पावलांचा गाव वेडा 
त्यातला हा पैँजणांचा भाव वेडा 

लाज माझी बांधली मी घुंगरूला 
वासनेच्या भावनांचा डाव वेडा 

काय सांगू या भुकेल्या पाखरांना 
हंबऱ्‍याने घातला घेराव वेडा 

उसळते ही लाट माझ्या काळजाची 
वाहणाऱ्‍या आसवांचा घाव वेडा 

सोनियाच्या आठवांचा तू कुमारा 
शोधतो जो जीवनाचा ठाव वेडा 

कविकुमार - 
(१७।२।१३)

-:( मरणाच्या दारावर ):-



मरणाच्या दारावर 
मागे वळुन पाहताना 
स्वतःला पाहिलय मी 
जीवनाकडुन हारताना 

झगडलो ज्या आयुष्यासाठी 
ते तर कमी होतच गेल 
जगायच अस म्हणतानाच 
तीळ तीळ मागे सुटत गेल 
स्वतःलाच पाहिल जेव्हा 
क्षणा क्षणाशी लढताना 
मरणाच्या दारावर 
मागे वळुन पाहताना 

आयुष्याच्या वाटेवरती 
अनेक नाती जुडत गेली 
आपुलकीने सांभाळुनही 
काहीच क्षणांत तुटून गेली 
स्वतःलाच उगाळले मी 
नात्यांसाठी जगताना 
मरणाच्या दारावर 
मागे वळुन पाहताना 

कविकुमार - 
(१८।५।१३)

-:( मुर्त विठ्ठलाची ):-


ती मुर्त विठ्ठलाची 
कना- कनात आहे 
निस्वार्थ भाव भक्ती 
माझ्यामनात आहे 

आज लागला रे 
ध्यास पंढरीचा 
विठुमाऊलीच्या 
तृप्त दर्शनाचा 
माय बाप पांडुरंग 
चरा- चरात आहे 
निस्वार्थ भाव भक्ती 
माझ्यामनात आहे 

मला लाभला रे 
वसा संततीचा 
ज्ञाना , सावता 
तुका अन् जनीचा 
निजरुप तुझे देवा 
मना- मनात आहे 
निस्वार्थ भाव भक्ती 
माझ्यामनात आहे 

शब्दाचीच ओवी 
शब्दाचे अभंग 
शब्द झाले धन्य 
बोलता श्रीरंग 
नाम तुझे कृपावंता 
मुखा- मुखात आहे 
निस्वार्थ भाव भक्ती 
माझ्यामनात आहे 

कविकुमार - 
(२२।५।१३)

-:( शोध ):-



गजल

शोध माझ्या जीवनाचा मीच घ्याया लागलो 
अंगणी माझ्याच जेव्हा मी जळाया लागलो 


घाव माझ्या वेदनेचे पाहिले नाही कुणी  
दुःख तेव्हा आसवांनी भागवाया लागलो 

कापलेले पंख माझे हारलो ना मी तरी 
भेदण्या
 आकाश तेव्हा मी उडाया लागलो 

काल होते दोस्त माझे तेच वैरी जाहले 
दुश्मनांशी मी लढूनी सावराया लागलो 

माजला दुष्काळ जेथे कोपलेल्या देवता
थेँब झालो अंकुराचा पाझराया लागलो

कविकुमार - 
(१५।५।१३)

-:( डबकं ):-


आयुष्य हे एखाद्या प्रवाहाप्रमाणे असतं 
वाहनं थांबल की "डबकंच" 

माग आपन बनतो त्या डबक्यातले बेडुक 
या डबक्याबाहेरही एक जग आहे हे जणु विसरूनच जातो 

ज्या दुर्घटनांनी आपल्याला ठेच दिली आपन त्यांचाच विचार का करतो ? 
त्यापेक्षा अशा दुर्घटनांवर मात करत आपला वेगळा मार्ग शोधने योग्य 

ज्याप्रमाणे प्रवाह अडथळ्यांना भेदुन आपला मार्ग शोधतो अगदी तसाच 

आयुष्य खुप सुंदर आहे 
कधी दुःखाचे खाचखळगे 
कधी सुखाचे तरंग आहे 

कविकुमार - 
(८।५।१३)