Saturday, 9 June 2012

-: थोडाच राहिलो :-


गजल 

नवखाच राहिलो मी 
परखाच राहिलो मी 

जपले कितीक नाते 
न्याराच राहिलो मी

तू वाच रोज गजला 
मतलाच राहिलो मी

होते कुणी न येथे 
माझाच राहिलो मी 

ना सूर्य चंद्र आहे 
ताराच राहिलो मी

जाळून जिंदगीला 
थोडाच राहिलो मी

माझ्याच सोनियाच्या 
ह्रदयात राहिलो मी

आहे कुमार त्याचा 
त्याचाच राहिलो मी

-कविकुमार 
(३०-५-२०१२)


Wednesday, 16 May 2012

‎-: रोमांच :-

‎गजल

पुन्हा सांज झाली पहा मित्र हो
कशी ती न आली पहा मित्र हो

सभोती तिच्या आठवांचा झरा
तिच्या मी हवाली पहा मित्र हो

तिला काय सांगू मला ना कळे
विचारे खुशाली पहा मित्र हो

अशी रात्र असते ग स्वप्नातली
पहाटे उगवली पहा मित्र हो

अरे सोनिया हाक मारू किती
अचानक बिलगली पहा मित्र हो

कुमारास ती भेटली सोनिया
कुठेही न अडली पहा मित्र हो

-कविकुमार
(22-5-2012)
 


Monday, 14 May 2012

-: रात्र गेली :-



गजल 

निष्पाप चांदण्यांना लपवून राञ गेली 
होती नशा सुखाची फसवून राञ गेली 

ते वायदे फुलांचे स्वप्नात तू दिलेले 
ते पोपटी उखाणे फितवून राञ गेली 

हा चंद्र चांदण्या पण काळोख सोबतीला 
या धूंद पापण्यांना मिटवून राञ गेली 

बैचेन आप्त सारे या स्तब्ध पावलांचे 
निस्वार्थता दिसेना हुडकून राञ गेली 

त्याचे टपोर डोळे टिपतात आसवांना 
स्पर्शाविनाच येथे उमलून राञ गेली 

त्याचे 'कुमार' डोळे दिसतेच सोनियाचे 
या आठवात सारी बिलगून राञ गेली 

- कविकुमार 
(१२।११।१२)

Saturday, 28 April 2012

-: तुझ्याविना :-





मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविना
 

मी असाच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविना 

रोज-रोज आठवात सांजवेळ साजणी 
तूच सांग ना मलाच कर गुन्हा तुझ्याविना 

का अशीच छेडते तुलाच सांगतो सदा 
मी कसे जगायचेच सांग ना तुझ्याविना 

मी हयात आजही तुलाच का दिसे न मी 
मरण सोसले किती क्षणाक्षणा तुझ्याविना 

आठवात एक एक दिवस वर्ष वाटते 
सोनिया 'कुमारची' जगेचना तुझ्याविना

-कविकुमार
(२७-०४-२०१२ )




Monday, 23 April 2012

-: गुन्हा :-







गजल 



ही वेदना मनाची मी साठवू कशाला ?

हे घाव जीवघेणे मी दाखवू कशाला ?



सोडून एकट्याला गेली कशी अशी तू

अलवार भावनांना मी सोपवू कशाला ?


माझ्या कुशीत होती का दूर-दूर झाली 

दुसर्यास या ठिकाणी मी झोपवू कशाला ?


नुसत्याच आठवांना घेऊन हिंडताना 

शोधावयास तुजला मी पाठवू कशाला ?


त्याचा कुमार नव्हता तू सांग सोनियाला 

आहे गुन्हाच त्याचा मी सोपवू कशाला ?


-कविकुमार

(१०-४-२०१२)
 

Wednesday, 18 April 2012

-: आयुष्य यातनांचे :-





आजुनही कळत नाही
हे आयुष्य कसे जपावे ?
मरता-मरता जगावे
की जगता-जगता मरावे ??

स्वताःच्याच मनाला
मीच कसे फसवावे ?
हसता-हसता रडावे
की रडता-रडता हसावे ??

सोबतीला कुणीच नाही
तर कुणासाठी थांबावे ?
गवसताना गमवावे
की गमवलेले गवसावे ??

यातना मनीच्या मांडताना
उगीच मनाला सावरावे ?
बिघडलेले सजवावे
की पुन्हा नव्याने बनवावे ??

आजुनही कळत नाही
हे आयुष्य कसे जपावे ?
मरता-मरता जगावे
की जगता-जगता मरावे ??

-कविकुमार
(18/4/2012)
 




Tuesday, 10 April 2012

-: ( घाव ) :-


 
गजल

शब्दास आज माझ्या मोजून भाव आहे
हृदयातल्या तळ्याशी माझाच गाव आहे

व्याख्या करू कशी मी व्याकूळ जीवनाची
मौनास आज माझ्या भलतेच नाव आहे

का बेचिराख स्वप्ने माझ्याच या मनाची
माझ्याच आप्तकांचा सारा बनाव आहे

जोडून हात माझे गेलोच शरण ज्यांना
पाठीवरीच माझ्या केलाच घाव आहे

हे वार जीवघेणे अलवार काळजाचे
हे पाहण्यास सारा जमला जमाव आहे

होणार अंत केव्हा या सोनियास सांगा
आहे 'कुमार' त्याचा त्याचीच हाव आहे

कविकुमार
(१०-४-१०१२)