Saturday, 28 April 2012

-: तुझ्याविना :-





मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविना
 

मी असाच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविना 

रोज-रोज आठवात सांजवेळ साजणी 
तूच सांग ना मलाच कर गुन्हा तुझ्याविना 

का अशीच छेडते तुलाच सांगतो सदा 
मी कसे जगायचेच सांग ना तुझ्याविना 

मी हयात आजही तुलाच का दिसे न मी 
मरण सोसले किती क्षणाक्षणा तुझ्याविना 

आठवात एक एक दिवस वर्ष वाटते 
सोनिया 'कुमारची' जगेचना तुझ्याविना

-कविकुमार
(२७-०४-२०१२ )




Monday, 23 April 2012

-: गुन्हा :-







गजल 



ही वेदना मनाची मी साठवू कशाला ?

हे घाव जीवघेणे मी दाखवू कशाला ?



सोडून एकट्याला गेली कशी अशी तू

अलवार भावनांना मी सोपवू कशाला ?


माझ्या कुशीत होती का दूर-दूर झाली 

दुसर्यास या ठिकाणी मी झोपवू कशाला ?


नुसत्याच आठवांना घेऊन हिंडताना 

शोधावयास तुजला मी पाठवू कशाला ?


त्याचा कुमार नव्हता तू सांग सोनियाला 

आहे गुन्हाच त्याचा मी सोपवू कशाला ?


-कविकुमार

(१०-४-२०१२)
 

Wednesday, 18 April 2012

-: आयुष्य यातनांचे :-





आजुनही कळत नाही
हे आयुष्य कसे जपावे ?
मरता-मरता जगावे
की जगता-जगता मरावे ??

स्वताःच्याच मनाला
मीच कसे फसवावे ?
हसता-हसता रडावे
की रडता-रडता हसावे ??

सोबतीला कुणीच नाही
तर कुणासाठी थांबावे ?
गवसताना गमवावे
की गमवलेले गवसावे ??

यातना मनीच्या मांडताना
उगीच मनाला सावरावे ?
बिघडलेले सजवावे
की पुन्हा नव्याने बनवावे ??

आजुनही कळत नाही
हे आयुष्य कसे जपावे ?
मरता-मरता जगावे
की जगता-जगता मरावे ??

-कविकुमार
(18/4/2012)
 




Tuesday, 10 April 2012

-: ( घाव ) :-


 
गजल

शब्दास आज माझ्या मोजून भाव आहे
हृदयातल्या तळ्याशी माझाच गाव आहे

व्याख्या करू कशी मी व्याकूळ जीवनाची
मौनास आज माझ्या भलतेच नाव आहे

का बेचिराख स्वप्ने माझ्याच या मनाची
माझ्याच आप्तकांचा सारा बनाव आहे

जोडून हात माझे गेलोच शरण ज्यांना
पाठीवरीच माझ्या केलाच घाव आहे

हे वार जीवघेणे अलवार काळजाचे
हे पाहण्यास सारा जमला जमाव आहे

होणार अंत केव्हा या सोनियास सांगा
आहे 'कुमार' त्याचा त्याचीच हाव आहे

कविकुमार
(१०-४-१०१२)

-:( भावनांचे मोल ):-

गजल

या भावनात माझ्या भावास मोल नाही
ज्योतीत आसवांच्या वातीस मोल नाही

मी दूर-दूर गेलो दूरावता न आले
ही रात्र जाग्रणाची यादेस मोल नाही

हृदयातल्या मनाची त्याचीच युध्दभूमी
माझ्याच मनगटाच्या जिद्दीस मोल नाही

लाचार जाहलेले आयुष्य वेचताना
अंकुरल्या फुलांच्या वेलीस मोल नाही

सांगे कुमार त्याला ती सोनियाच माझी
मी भेटताच त्याला भेटीस मोल नाही

कविकुमार
(१०-४-१०१२)

 

Tuesday, 3 April 2012

।। शराबि अदा ।।



ही गुलाबि हवा
ध्यास लावी मना
ही शराबि अदा
वेड लावी जीवा !!

गुंतलो मी कसा ?

भान नाही मला
वाहते ही हवा
गंध येतो तुझा
ही शराबि अदा
वेड लावी जीवा !!

दाटतो कंठ हा

याद येते मला
मोहोरती चांदन्या
भास होतो तुझा
ही शराबि अदा
वेड लावी जीवा !!

स्पर्श स्पर्शातूनी

शहारतो मी असा
धुंद नयनांत या
हरवतो मी जसा
ही शराबि अदा
वेड लावी जीवा !!

ही गुलाबि हवा

ध्यास लावी मना
ही शराबि अदा
वेड लावी जीवा !!

-कविकुमार

(३।४।२०१२)

-: ( भूक ) :-

गजल

हा रोज चाललेला लीलाव भावनांचा
हे शब्द स्तब्ध होते माझ्याच मानसांचा

नुसत्याच वासनांचा येथेच पावसाळा
त्याला महत्व आहे काळ्याच कागदांचा

थैमान माजलेला प्रत्येक आसवांचा
ना अर्थबोध त्याला माझ्याच झुरण्यांचा

नाहीच अन्नदाता झोपू कसा उपाशी
हा खेळ उंदिराचा आनंद मांजरांचा

तू सांग सोनियाचा येणार दिवस केव्हा
आहे सभोवताली हा काळ राक्षसांचा

पाही कुमार माझ्या बागेत रोपट्यांना
आतूर जीव आहे त्याच्याच रक्षणांचा

कविकुमार
(१-४-२०१२)