Monday, 27 January 2014

-:( करार जीवनाचा ):-


गजल 


माझाच 
जीवनाशी ऐसा करार होता ! 
डोळ्यात आसवांना माझा नकार होता !! 

आदर्श जीवनाच्या साऱ्‍याच आठवांचा ; 
माझ्या तनामनाशी खोटाच भार होता !! 

सोडून चाललो मी काही सुधारकांना ; 
आयुष्य जाणण्याचा तो एक सार होता !! 

एकेक श्वास माझा होता गुलाम त्यांचा ; 
भयभीत काळजावर अज्ञात वार होता !! 

पोटात
 भूक मोठी ही खंत भाकरीला ; 
ऐकाच ढेकराचा त्यांचा पगार होता !! 

विश्वासघातक्यांचे मार्गावरी निखारे ; 
सांगु कुणाकुणाला पण तो , "कुमार" होता !! 

कविकुमार - 
(१८।११।१३)

-:[ मोती तुझ्या स्मितांचे ]:-


भरगच्च आठवांनी 
काळीज उसवले होते 
मोती तुझ्या स्मितांचे 
हृदयात दडवले होते 

बघ काळ्या राञीलाही 
एकांत रोजचा छळतो 
नक्षञ तुझ्या स्मरनाचे 
चंद्रास बिलगले होते 

गेलेल्या आयुष्याचे 
घोट कडू मी प्यालो 
क्षण तुझ्याच सोबतीचे 
जगण्यात मिसळले होते 

झेलाया रीमझीम थोडी 
मी ओँझळ अलगद केली 
नभ माझ्या प्रारब्धाचे 
आधीच बरसले होते 

माझ्या खुळ्या मनाचा 
केला न खयाल कोणी ? 
नुसतेच तुझ्या स्वप्नांचे 
मी गावं सजवले होते 

मागाया सौख्य जरासे 
मी मीटले डोळे जेव्हा 
पण आकाशीचे सारे 
तारेच निखळले होते 

कविकुमार - 
(२६।१०।१३)

-:( व्यर्थता ):-


तू होतीस तोवरी या 
भावनांना अर्थ होता 
आज माझ्या लेखनीचा 
शब्द-शब्द व्यर्थ होता 

तू होतीस तोवरी या 
स्वप्नांना अर्थ होता 
आज माझ्या पापणीचा 
थेँब-थेँब व्यर्थ होता 

तू होतीस तोवरी या 
आठवांना अर्थ होता 
आज माझ्या मोगऱ्‍याचा 
गंध-गंध व्यर्थ होता 

तू होतीस तोवरी या 
जगण्याला अर्थ होता 
आज माझ्या स्पंदनांचा 
श्वास-श्वास व्यर्थ होता 

कविकुमार - 
(२।१०।१३)

Sunday, 26 January 2014

-:( व्यथा ):-



गजल 

हे बघा प्रारब्ध माझे टांगलेली लक्तरे ! 
फाटले अस्तीत्व तेव्हा लावलेली अस्तरे !! 

बाग होती त्या कळ्यांची श्वास माझे कोँडले ; 
पण फुले गंधाळताना गोठलेली अत्तरे ! 

वेचण्या दाणे सुखाचे मी जरी झेपावलो ; 
झोँबलि घसास माझ्या ती भुकेली पाखरे ! 

भासला एकांत जेव्हा हाक मी त्याला दीली ; 
जवळ त्याला ओढताना वाढलेली अंतरे ! 

तारले कोणीच नाही हे 'कुमारा' आजही ; 
दैव नाही पण तरीही पुजलेली पत्थरे ! 

कविकुमार - 
(१३।९।१३)

Saturday, 21 December 2013

-:[ जरासे ]:-


गजल 

अंधार फार झाला , सांभाळले जरासे! 
आकाश पांघराया , कवटाळले जरासे! 

सौँदर्य अंतरीचे गर्दीत शोधताना; 
वाटेत जीवनाच्या , ठेचाळले जरासे! 

घेऊन आठवांना काळीज कापते रे; 
प्राशून आसवांना मी , ढाळले जरासे! 

या वाहत्या झऱ्‍याला केले जपून गोळा; 
पण दुःख यार माझे फेसाळले जरासे! 

सूर्यास पाहिले मी , तो तर 'कुमार' होता; 
उगवेल या भयाने कुरवाळले जरासे! 

कविकुमार - 
(१३।८।१३)


-:( तुझ नाव राहून गेल ):-


अश्रु पुन्हा ओघळले आज 
सखे तुझी आठवण काढताना 
नाही विसरू शकलो तुला 
मी आजही पुढे चालताना 

गंध त्या क्षणांचा सखे 
आजही विरला नाही 
जखमा माझ्या मनाच्या 
आजही भरल्या नाही 

किती वर्ष सरले तरी 
तू आजही तीथेच आहे 
मनातली तुझी जागा 
आजुनही तशीच आहे 

एकांतात भेटून सखे 
हितगुजनेही राहून गेलं 
आठवणी पुसून टाकल्या 
तरी तुझ नाव राहून गेलं 

कविकुमार - 
(२४।७।१३)


-:( आकाशी नभ गरजत होते ):-




आकाशी नभ गरजत होते 
तुझ्याच साठी बरसत होते 

फुलराणीचा गंध सखे तू 
मोरपीसाचा रंग सखे तू 
तुला पाहण्या आकाशीचे 
चंद्र चांदणे तरसत होते 
आकाशी नभ गरजत होते 
तुझ्याच साठी बरसत होते 

मज हृदयीचा श्वास सखे तू 
जगण्याचा निश्वास सखे तू 
तुला शोधण्या भवतालीचे 
वारे देखील भटकत होते 
आकाशी नभ गरजत होते 
तुझ्याच साठी बरसत होते 

लावंण्याची बाग सखे तू 
स्वरमालेचा राग सखे तू 
तुला भेटण्या शीँपल्यातले 
मोती देखील उमलत होते 
आकाशी नभ गरजत होते 
तुझ्याच साठी बरसत होते 

कविकुमार - 
(२६।७।१३)